राज्यात मराठा, ओबीसी आणि बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री पंकजा मुंडे यांचे वक्तव्य

राज्याच्या वातावरण सध्या चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे, कारण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषणा नंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला. आता बंजारा समाजाकडून देखील आरक्षणासाठी आंदोलने केली जात आहे. यामुळे आता आरक्षणाच्या संघर्षावर मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलंय.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, ओबीसी-मराठा संघर्ष आहे. मात्र ज्या पद्धतीने तो मांडला जात आहे त्या पद्धतीने मला पाहायला मिळत नाही. कारण मी तसे चष्मे लावून फिरत नाही. मी एखाद्या माणसाकडे बघत असताना जातीचा रंग पाहत नाही. त्यामुळे कदाचित तसे मला दिसत नाही. अनेक समाज वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षण मागत आहेत. तिथला समाज विरोध करतो हे नैसर्गिक आहे. जसे त्यांचे मागणे नैसर्गिक तसा विरोधही नैसर्गिक आहे. यातून मार्ग काढणे हे नेत्याचे कर्तव्य आहे. आत्ताच्या राज्यकर्त्यांनी राजासारखे मन ठेवून सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे. सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांना कुठेही धक्का न लागता निर्णय घेतला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात रेल्वे दाखल झाली. गोपीनाथ मुंडे यांची कोणती आठवण राहिली आहे. याबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, साहेब नेहमी म्हणायचे की, बीडची रेल्वे, बीडची रेल्वे… परळीत रेल्वे होती. मात्र बीडमध्ये रेल्वे नव्हती आणि त्यामुळे विकासापासून जिल्हा मागे राहिला. गोपीनाथ मुंडे खासदार झाल्यानंतर त्यांनी हा पहिला विषय मांडला. यात सर्वांचे योगदान राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार, असे त्यांनी म्हटले. आता इथून पुढे बीड परळी रेल्वे मार्गासाठी प्रयत्न असणार आहे, असे देखील पंकजा मुंडे यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, बीड जिल्ह्यात जी अतिवृष्टी झाली, त्याचा आढावा घेण्यासाठी आजची बैठक आहे. आज प्रशासनाकडून आढावा घेऊन उद्या कॅबिनेट बैठकीत याबाबत माहिती देणार आहे. सरकारची मानसिकता शेतकऱ्यांच्या मागे राहण्याची आहे, असे त्यांनी म्हटले.



