काटोलमध्ये पारधी समाजातील महिलांशी कथित गैरवर्तनाचा आरोप; प्रहारच्या आंदोलनानंतर बँक प्रशासनाची जाहीर माफी

बचत गटाचे खाते उघडण्यास गेलेल्या महिलांची तक्रार; भविष्यात भेदभाव होणार नसल्याचे बँकेचे आश्वासन
काटोल | प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील बँक ऑफ इंडिया शाखेत पारधी समाजातील महिलांशी कथित अपमानास्पद वर्तन झाल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेनंतर प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक भूमिका घेत बँकेतच आंदोलन केले. त्यानंतर शाखा व्यवस्थापक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी महिलांची जाहीर माफी मागितली असून भविष्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.
माहितीनुसार, काटोल तालुक्यातील डोंगरगाव येथील पारधी समाजातील काही महिला बचत गटाचे खाते उघडण्यासाठी बँक ऑफ इंडिया शाखेत गेल्या होत्या. यावेळी एका कर्मचाऱ्याने पारधी समाजाबाबत कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप संबंधित महिलांनी केला. या प्रकारामुळे त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
घटनेनंतर महिलांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत प्रहारचे काटोल-नरखेड विधानसभा प्रमुख दिनेश निंबाळकर, अजय पांडे, अभिनय सातपुते तसेच पारधी समाजाच्या प्रतिनिधी नेहा राजपूत यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला बँकेत दाखल झाल्या.
आंदोलनादरम्यान महिलांनी बँक प्रशासनाविरोधात निषेध नोंदवत काही कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांशी कथित गैरवर्तन होत असल्याचेही सांगितले. प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी शाखा व्यवस्थापकांना घटनेचे गांभीर्य लक्षात आणून देत भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी केली.
यानंतर झालेल्या चर्चेनंतर शाखा व्यवस्थापक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी उपस्थित महिलांची जाहीर माफी मागितली. तसेच जाती, समाज, धर्म किंवा इतर कोणत्याही आधारावर कोणत्याही ग्राहकाशी भेदभावपूर्ण अथवा अपमानास्पद वर्तन केले जाणार नाही, अशी ग्वाही बँक प्रशासनाने दिली.
त्यानंतर संबंधित महिलांच्या बचत गटाची खाती तातडीने उघडण्यात आली. या निर्णयानंतर महिलांनी समाधान व्यक्त केले असून, सामाजिक सन्मानाच्या प्रश्नावर प्रहार संघटनेने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले.
या घटनेमुळे सार्वजनिक सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये प्रत्येक नागरिकाशी समानतेने आणि सन्मानपूर्वक वागण्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित झाली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या तक्रारी टाळण्यासाठी बँक प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



