नांदेडच्या मुखेडमध्ये भीषण अपघात

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरातील बाराहाळी नाका येथे आज दुपारी भीषण अपघात झाला. माहितीप्रमाणे, भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले आणि ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काळी-पिवळी जीपला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत जीप उलटली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच ते सहा मोटरसायकल चिरडल्या गेल्या.
या अपघातात सात ते आठ लोक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचीही चर्चा असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.



