वनमजदुरावर हल्ला, जागीच मृत्यू

मेलघाट – मेलघाटात गेल्या काही दिवसांपासून वाघांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. ताज्या घटनेत एका वनमजदुरावर वाघाने हल्ला करून त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांत प्रचंड भीतीचं वातावरण आहे. गावांमध्ये शाळा, शेतकाम आणि दैनंदिन जीवन ठप्प झालं आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार केवलराम काले यांनी तात्काळ पुढाकार घेत वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर मंत्रालयातून मोठा निर्णय घेण्यात आला. वनमंत्रींनी नरभक्षी वाघाला तात्काळ पकडण्याचे आदेश दिले आहेत. विशेष पथक मेलघाटात रवाना करण्यात आले असून ट्रॅपिंग आणि ट्रँक्विलायझर टीम सज्ज करण्यात आली आहे.
मृत्यू झालेल्या वनमजदुराच्या कुटुंबीयांनाही दिलासा देण्यात आला आहे. मृत वनमजदुराच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली. मेलघाटातील नागरिकांना दिलासा देणारा हा निर्णय असून आता या भागात शांती परत येण्याची आशा व्यक्त होत आहे.



