आयसीयूमध्ये परदेशी महिलेवर बलात्कार, डॉक्टर अटकेत

गोवा – गोव्यातील जुन्या गोव्यात एक लज्जास्पद आणि हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. हेल्थवे हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये २४ वर्षीय मोरोक्कन महिलेवर बलात्कार झाल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोलापूर येथील २८ वर्षीय डॉक्टर वृषभ दोशीला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला बिझनेस व्हिसावर भारतात आली होती आणि गोव्यातील दिवार बेटाजवळील एका एनजीओच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होत होती. प्रशिक्षणादरम्यान तब्येत बिघडल्याने तिला तातडीने हेल्थवे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना आरोपी डॉक्टर तपासणीच्या बहाण्याने आत गेला, नर्सला बाहेर पाठवले आणि महिलेवर लैंगिक अत्याचार केला.
या कृत्यानंतर आरोपी डॉक्टर गोव्यातून फरार झाला आणि सोलापुरात पोहोचला. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरला तात्काळ निलंबित केले असून पीडितेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या महिलेवर उपचार सुरू आहेत आणि पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.



