Helth CareLatest News

नागपूर जिल्ह्यात कर्करोग रुग्ण वाढले; पारशिवनी-रामटेक हॉटस्पॉट, तंबाखूचे व्यसन ठरले घातक

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी आणि रामटेक तालुका हे तंबाखू, बिडी आणि गुटख्याच्या अतिवापरामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. स्थानिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, या दोन्ही तालुक्यांत कर्करोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ११ डिसेंबर २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान “आपल्या दारी दवाखाना” या मोहिमेत तब्बल २ हजार ८७० रुग्णांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २ हजार ३६ तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळले. फक्त पारशिवनी तालुक्यात २२६ तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण नोंदवले गेले आहेत. एवढंच नाही तर येथे ३९ स्तनाच्या कर्करोगाचे आणि ४५ गर्भाशयाच्या कर्करोगाचे रुग्ण देखील सापडले. तर रामटेक तालुक्यात २५० तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळले. यासोबत ८७ स्तनाच्या कर्करोगाचे आणि ४२ गर्भाशयाच्या कर्करोगाचे रुग्ण नोंदवले गेले आहेत. सध्या पारशिवनी आणि रामटेक तालुक्यांमध्ये एकूण ४७६ कर्करोगाचे रुग्ण उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाचे अधिकारी या आकडेवारीवरून प्रचंड चिंतेत असून, कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जनजागृती मोहिमा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य तज्ज्ञ डॉ. निनाद पाठक यांनी स्पष्ट केले की – “कर्करोग हा आजार असाध्य नाही. तो उपचार करण्यायोग्य आहे. मात्र, वेळेत निदान झाले पाहिजे. आणि त्यासाठी जागरूकता निर्माण करणे हेच सर्वात मोठे हत्यार आहे. डॉ. पाठक यांच्या मते, तरुणांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे. अन्यथा नागपूर जिल्हा ही कर्करोगाची राजधानी बनेल, अशी गंभीर शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button