तालुक्यात एका दिवसात दोन आत्महत्यांच्या घटना

मंगरूळ दस्तगीर तालुक्यात एका दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
पहिली घटना चिंचोली येथील आहे. येथील उमेश तुकाराम वांढरे, वय 32 वर्ष, या तरुणाने काल रात्री सुमारे 11 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच गावात शोककळा पसरली.
तर दुसरी घटना जळगाव मंगरूळ येथील आहे. येथे राहणारे राजेंद्र रामभाऊ चौधरी, वय 59 वर्ष, या शेतकऱ्याने मध्यरात्री सुमारे 3 वाजून 55 मिनिटांच्या सुमारास गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. शेतकऱ्याच्या आत्महत्येने परिसरातील वातावरण अधिकच गंभीर झाले आहे.
दोन्ही घटनांची माहिती तात्काळ मंगरूळ दस्तगीर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे पाठवले. घटनेचा पुढील तपास मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गौतम इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.



