नागपूरमध्ये मुलानेच केली वडिलांची चाकूने भोसकून हत्या

नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीतील पिंडकापार गावात बाप-लेकातील वादातून धक्कादायक हत्या घडली आहे.
मृत व्यक्तीचे नाव भावराव गोविंदा मांढरे (वय ७५) असून, त्यांचा मुलगा रवी भावराव मांढरे (वय ३१) हा आरोपी आहे. बाप-लेक मासेमारीचा व्यवसाय करायचे, परंतु दोघांनाही दारूचे व्यसन असल्याने घरगुती वाद नेहमीच पेट घेत असत.
३ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पुन्हा वाद झाला. वडील झोपेत असताना, मुलगा रवीने संतापाच्या भरात चाकू उचलला आणि वडिलांच्या शरीरावर वारंवार वार केले. गंभीर जखमा झाल्याने भावराव यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती गावभर वाऱ्यासारखी पसरली. तात्काळ गावातील पोलीस पाटील इंदिरा पानसे यांनी रामटेक पोलिसांना कळवले. पोलिसांनी धाव घेऊन घटनास्थळी पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तसेच न्यायवैद्यक पथकाला देखील बोलावण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथे पाठवण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपी मुलगा रवीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.



