पित्यानेच विवाहित मुलगी आणि तिच्या प्रियकराचा केला खून

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील करकाळा शिवारातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक सन्मानासाठी पित्यानेच विवाहित मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा हातपाय बांधून खून केल्याची घटना समोर आली आहे. जुन्या प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे.
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील करकाळा शिवारात काल रात्री उशिरा एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना घडली. विवाहित मुलगी आपल्या सासरी राहूनही जुन्या प्रियकराशी संपर्कात होती. याच कारणावरून प्रियकर तिला भेटण्यासाठी सासरी आला होता. या भेटीदरम्यान सासरच्या मंडळींनी दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. यामुळे संतप्त झालेल्या सासरच्या मंडळींनी मुलीच्या वडिलांना फोन करून तक्रार दिली, “तुमची मुलगी आम्हाला लागत नाही, तिला घेऊन जा.” या तक्रारीनंतर मुलीचे वडील, काका आणि आजोबा यांनी दोघांना गावाकडे नेण्याचा निर्णय घेतला. मात्र रागाच्या भरात त्यांनी हातपाय बांधून दोघांना विहिरीत फेकून खून केला. या दुर्दैवी घटनेनंतर पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री बारा वाजेपर्यंत दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी दिली असून, प्राथमिक तपासानुसार जुन्या प्रेमसंबंधामुळे ही घटना घडल्याचे समोर आले आहे. मृत मुलाच्या वडिलांनीही उमरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे की, मुलगी सतत फोन करून त्याच्या मुलाशी बोलत होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.
एकीकडे कौटुंबिक मान-सन्मान, दुसरीकडे प्रेमसंबंध – यामध्ये दोन तरुणांचे जीव गेले. समाजाने अशा टोकाच्या निर्णयांना आळा घालण्यासाठी संवाद आणि कायदेशीर मार्गांचा अवलंब करणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते. पुढील तपासानंतर अजून काही धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात.



