मारेगावचे ठाणेदार उमेश बेसरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; यवतमाळ पोलीस दलात शोककळा

यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार, पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण पोलीस दलासह यवतमाळ जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांना तात्काळ वणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गेल्या वर्षीच पुसद येथून मारेगाव येथे बदली झालेले पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर त्यांच्या शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे कमी वेळातच स्थानिक लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात ते नेहमीच तत्पर आणि कार्यक्षम होते. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुले असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



