AmravatiCrime NewsLatest News

बायोकोल फॅक्ट्रीत सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांचा छापा; ८ जण ताब्यात, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती: अमरावती. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार, अमरावती शहर गुन्हे शाखेने अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली आहे. बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील निंभोरा लाहे गावात असलेल्या एका बायोकोल फॅक्ट्रीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी १० लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फॅक्ट्री मालकासह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गुप्त माहितीवरून कारवाई

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, २१ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांच्या पथकाने निंभोरा लाहे येथील संकल्प इंडस्ट्रिज या बायोकोल फॅक्ट्रीवर धाड टाकली. यावेळी फॅक्ट्रीच्या ऑफिसमध्ये कंपनीचा मालक श्रीकांत पिंजरकर आणि त्याचे सात साथीदार ‘एक्का बादशाह’ नावाचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडले गेले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले.

१० लाखांचा मुद्देमाल जप्त

या धडक कारवाईत पोलिसांनी ६१,०४० रुपये रोख रक्कम, ८ मोबाईल फोन, दोन चारचाकी गाड्या आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १० लाख ११ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ताब्यात घेतलेल्या सर्व आठ आरोपींविरुद्ध बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये श्रीकांत अशोकराव पिंजरकर, उमेश मंगलप्रसाद पांडे, उज्वल गोपाळराव लाहे, प्रकाश भीमराव पडोळे, नितीन गुलाबराव सुने, किसन विठ्ठलराव देशमुख, संजय वामनराव इंगोले आणि स्वप्नील गणेशराव ठाकरे यांचा समावेश आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button