उदगीरमध्ये कायद्याचा धाक शून्य? पुन्हा एकदा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

उदगीर: उदगीर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आठ दिवसांपूर्वी दुकानात घुसून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर आता आणखी एका मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शहरात कायद्याचा धाक राहिला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला असून, नागरिक भयभीत झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
उदगीरमध्ये दुसऱ्यांदा घडलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काहीजण एका व्यक्तीला धारदार हत्यारांनी मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
आठ दिवसांत घडलेल्या या दोन घटनांमुळे उदगीरमधील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



