साईनगर स्पर्धा परीक्षा ग्रंथालयास आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची भेट; विद्यार्थ्यांशी संवाद, मार्गदर्शन व वृक्षारोपणाचा उपक्रम
अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी साईनगर येथील स्पर्धा परीक्षा ग्रंथालय व अभ्यासिकेला भेट देऊन तेथील सुविधा आणि व्यवस्थेचा आढावा घेतला.
या दौऱ्यादरम्यान आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचे अभ्यासिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यांनी अभ्यासिकेतील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला व परीक्षेच्या तयारीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंका आणि अडचणींवर त्यांनी उपयुक्त सूचना दिल्या.
यावेळी आयुक्तांच्या हस्ते अभ्यासिका परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. तसेच त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून आवश्यक सुधारणा व सुविधा वाढविण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
अधिकार्यांबरोबर चर्चा करतांना आयुक्तांनी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे शांत, सुरक्षित आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यावर भर दिला. त्यांच्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या मनात नवीन प्रेरणा निर्माण झाली आहे.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निर्देश अभ्यासिकेतील सुविधा वाढवाव्यात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या सुविधा जसे की भरपूर प्रकाश, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी याची पूर्तता करावी. स्वच्छता आणि निगा राखावी. अभ्यासिका आणि संलग्न परिसरात नियमित स्वच्छता ठेवण्यात यावी. कचरा व्यवस्थापन, डास-नियंत्रण यावर विशेष लक्ष देण्यात यावे. वाचनालयातील पुस्तके अद्ययावत करावीत. स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी उपयुक्त व सद्यस्थितीत वापरली जाणारी पुस्तके आणि संदर्भ साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे. विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन तसेच नियमितपणे तज्ज्ञ मार्गदर्शकांना आमंत्रित करून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन सत्रे घेण्यात यावीत. सुरक्षा व्यवस्था सक्षम करावी. अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक यांची योग्य व्यवस्था करावी. वृक्षारोपण आणि हरित परिसर विकास तसेच परिसरात अधिक वृक्षारोपण करण्यात यावे आणि आधीच्या झाडांची निगा राखण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांच्या सूचना आणि तक्रारींसाठी यंत्रणा निर्माण करावी. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी एक Feedback/Suggestion Box किंवा डिजिटल फॉर्म सुरू करण्यात यावा.
साईनगर येथील स्पर्धा परीक्षा ग्रंथालय व अभ्यासिकेला भेट देतांना आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत पुढीलप्रमाणे आवाहन केले की, शिक्षण हीच खरी शक्ती आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून समाजासाठी काम करण्याची संधी मिळते, त्यामुळे अभ्यास करतांना आत्मविश्वास ठेवा, सातत्य ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. महानगरपालिका प्रशासन तुम्हा सर्वांच्या पाठीशी आहे.
शहराच्या प्रगतीसाठी केवळ प्रशासन नाही, तर प्रत्येक नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. सार्वजनिक सुविधा जपणं, स्वच्छता राखणं, आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये प्रत्येकाने योगदान द्यावं. विशेषतः तरुणांनी सामाजिक भान ठेवत पुढे यावं आणि अमरावतीचं नाव उज्वल करावं.
यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, महिला व बाल विकास अधिकारी तथा शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, पंकज सपकाळ, अमोल साकुरे, प्रियंका चौहान, श्रीधर हिवराळे, प्रीती बमनोते, अनिकेत भांडे, विशाल इंगोले, मनपा कर्मचारी, विद्यार्थी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.



