जिल्हा बँकेतील नोटीस प्रकरण ‘क्लोज’, अंतिम निर्णयाकडे लक्ष; संचालक आनंद काळे यांच्या अपात्रतेवर २९ जुलैला सुनावणी

जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला एक महत्त्वाचे वळण मिळाले आहे. बँकेला बजावण्यात आलेल्या दंडाच्या नोटीस प्रकरणात न्यायालयाने ‘क्लोज’ (बंद) केले असून, यावरचा अंतिम निर्णय मात्र राखून ठेवला आहे. यामुळे आता या प्रकरणावर न्यायालयाचा अंतिम निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याशिवाय, बँकेचे संचालक आनंद काळे यांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर येत्या २९ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे बँकेतील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.
नोटीस प्रकरणाचा घटनाक्रम
बँकेतील विरोधी संचालकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने विभागीय सहनिबंधक कार्यालयाने चौकशी समितीची स्थापना केली होती. या समितीला जिल्हा बँकेने आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्यामुळे बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, तसेच कागदपत्रे सादर करेपर्यंत दंडही ठोठावला होता.
याविरोधात बँकेने न्यायालयात धाव घेतली होती. या संदर्भात दोन वेळा सुनावणी पार पडली असून, मंगळवार, २२ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सदर प्रकरण प्राथमिक स्वरूपात आदेशासाठी बंद केल्याचे स्पष्ट झाले आहे.
आनंद काळे यांच्या अपात्रतेचे प्रकरण
दरम्यान, बँकेचे संचालक आनंद काळे यांच्यावर विविध प्रकरणांमध्ये अनियमितता केल्याचा आरोप ठेवत त्यांना अपात्र ठरवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. यावर २९ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याने, या प्रकरणाचा निकाल बँकेच्या राजकारणावर मोठा परिणाम करू शकतो.
प्रतिनिधी : नितेश किल्लेदार



