धामणगांवातील वृक्षप्रेमींकडून वृक्षारोपण आणि फवारणी करून सहकाऱ्याचा वाढदिवस साजरा!
धामणगाव रेल्वे : वाढदिवस म्हणजे सहसा मित्र आणि नातेवाईकांसोबत जल्लोष आणि आनंद साजरा करण्याचा दिवस असतो. मात्र, धामणगावातील काही वृक्षप्रेमींनी आपल्या एका सहकारी मित्राचा वाढदिवस पर्यावरणाच्या हितासाठी एक वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. निसर्गात वृक्षारोपण करून निसर्गाच्या संवर्धनात आपला खारीचा वाटा उचलण्याच्या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबवला.
शहरातील मॉर्निंग ग्रुपचे सदस्य सुधीर शेळके यांचा वाढदिवस त्यांच्या सहकारी मित्रांनी सेफला ग्राउंड येथे वृक्षारोपण आणि तणनाशक फवारणी करून साजरा केला. यावेळी अनेक वृक्षांची लागवड करून सुधीर शेळके यांना त्यांच्या सहकारी मित्रांनी वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बनसोड, संजय शेंडे, माधव गोडे, प्रमोद भगत, किशोर बागवान, आशिष धुरट, गणेश पालीवाल, विलास तायडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी वृक्षारोपण आणि फवारणी करून सुधीर शेळके यांना शुभेच्छा दिल्या. आपला वाढदिवस वृक्ष लावून साजरा केल्यास निसर्गाला त्याचा फायदा होईल, असा महत्त्वपूर्ण संदेशही या निमित्ताने देण्यात आला.
प्रतिनिधी : संतोष वाघमारे



