AmravatiLatest News

कचरा संकलन व कचरा वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न…

अमरावती : स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत अमरावती महानगरपालिका व स्वच्छता ज्ञान भागीदार फीडबॅक फाउंडेशन चारिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कचरा संकलन व वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यक्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक २१ जुलै २०२५ रोजी हॉटेल विरसा, बडनेरा रोड, अमरावती येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली.
सदर प्रशिक्षण कार्यशाळा मनपा आयुक्त सौम्या शर्मा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. त्यांच्या दूरदृष्टी आणि प्रशासनिक पाठबळामुळेच या उपक्रमास अपेक्षित यश लाभले.
कार्यशाळेची सुरुवात सहभागी कर्मचाऱ्यांच्या नोंदणी व प्रशिक्षण साहित्य वितरणाने झाली. सहभागी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण किटमध्ये बॅग, नोटपॅड, लेखन साहित्य व स्टीलची पाण्याची बाटली प्रदान करण्यात आली. प्रारंभिक सत्रात चहा व अल्पोपहाराचीही व्यवस्था होती.
मनपा झोन क्र. १ रामपुरी कॅम्प अंतर्गत कार्यरत जेष्ठ स्वास्थ निरीक्षक, स्वास्थ निरीक्षक,कंत्राटदार, स्वच्छता सेवक, मदतनीस, वाहनचालक व पर्यवेक्षक अशा ६० हून अधिक कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
प्रारंभिक सत्रात अमरावती शहराच्या स्वच्छ भारत अभियानाच्या शहर समन्वयक श्वेता बोके यांनी कार्यशाळेचे उद्दिष्ट स्पष्ट केले व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यानंतर फीडबॅक फाउंडेशनचे विषयतज्ज्ञ श्री. ज्योती प्रकाश यांनी “घनकचरा व्यवस्थापन मूल्यसाखळीवर आधारित संसाधन पुनर्प्राप्ती व कार्यक्षमता वृद्धी” या विषयावर सविस्तर सत्र घेतले. या सत्रामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश होता:

  • कचऱ्याचे प्रकार व स्त्रोतावर वर्गीकरण
  • हिरव्या व निळ्या डस्टबिनचा वैज्ञानिक वापर
  • वैयक्तिक संरक्षण साधनांचा आवश्यक वापर
  • कचरा वाहतूक वाहनांची दैनंदिन तपासणी व देखभाल
  • मार्ग नियोजन व धोकादायक कचऱ्याची ओळख
  • सार्वजनिक पत्त्याचे यंत्रणांचे प्रभावी संचालन
  • सार्वजनिक वर्तन शिष्टाचार व सन्मानपूर्वक स्वच्छता कार्य

प्रशिक्षण सहभागीमूलक स्वरूपाचे होते, ज्यामध्ये प्रात्यक्षिके व संवादात्मक सत्रांद्वारे कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत करण्यात आले. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी झोन क्रं. १ चे ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक श्री. आर. के. ढिक्याव यांनी मार्गदर्शन करत सर्व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणामधून घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष कामात करावा, असे आवाहन केले. कार्यशाळेनंतर अनेक स्वच्छता कर्मचारी यांनी अशा प्रकारचे प्रशिक्षण दर तीन ते सहा महिन्यांनी आयोजित करावे अशी इच्छाशक्ती व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे त्यांना आत्मसन्मान, सुरक्षा आणि कार्यदक्षतेमध्ये लक्षणीय वाढ जाणवली आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या वतीने अशा उपक्रमांच्या माध्यमातून व्यावसायिक व उत्तरदायी नागरी सेवा सुनिश्चित करण्याचा संकल्प अधोरेखित करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button