AmravatiLatest News

अमरावतीत ५७ ड्रग तस्कर एसपी समोर हजर – “गाठ माझ्याशी आहे!” असा कठोर इशारा

अमरावती : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्यातील अमली पदार्थाच्या व्यवसायात गुंतलेल्या ५७ आरोपींना थेट पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या समोर हजर करण्यात आलं. या वेळी त्यांनी कठोर शब्दांत इशारा देत सांगितलं की, “अवैध व्यवसायात पुन्हा आढळलात तर तडीपारी आणि कठोर कायदेशीर कारवाईला तयार रहा. गाठ माझ्याशी आहे!”

अवैध तस्करी करणाऱ्यांना सक्त ताकीद
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी यावेळी तंबी दिली की, गांजा, एमडीसह अन्य अमली पदार्थांच्या तस्करी, विक्री वा वितरणात सहभागी होणाऱ्यांविरुद्ध अजिबात सहनशीलता दाखवली जाणार नाही. त्या सर्वांना पोलिसांच्या रडारवर ठेवण्यात आलं आहे.

गेल्या दहा वर्षात ५७ आरोपींविरुद्ध कारवाईचा बडगा
जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारात गुंतलेल्या ५७ आरोपींना २६ जून रोजी हजर करून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव राबवण्यात आला.

शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम
राज्य सरकार व डीजी ऑफिसच्या निर्देशानुसार, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी शाळा व महाविद्यालयांत परिसंवाद व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पोलिस अधिकारी, समाजसेवी संस्था व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

जनतेला आवाहन: माहिती द्या, मदत करा
“अमली पदार्थांचे दुष्परिणाम केवळ शरीरावरच नव्हे, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतात. त्यामुळे कुणीही अशा व्यवसायात गुंतल्याचे निदर्शनास आले, तर तत्काळ पोलिसांना माहिती द्या” – असं आवाहन पोलिस प्रशासनाने केलं.

स्थानिक गुन्हे शाखेचा तपशीलवार अहवाल
स्थानीय गुन्हे शाखेचे प्रमुख किरण वानखडे यांनी अमरावती जिल्ह्यातील अमली पदार्थ प्रकरणावरील तपशीलवार सांख्यिकी अहवाल एसपी विशाल आनंद यांच्यासमोर सादर केला.

सतर्कतेचा इशारा, सजगतेचं आवाहन!
पोलीस अधीक्षकांनी दिलेला हा कठोर इशारा म्हणजे अमरावतीतील अमली पदार्थ तस्करांसाठी धोक्याची घंटा आहे. पोलिसांची कारवाई आता अधिक तीव्र होणार असल्याचं संकेत स्पष्टपणे दिसत आहेत.

प्रतिनिधी : नितेश किलेदार

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button