पुसद-हिंगोली मार्गावर एसटी बसचा अपघात; 40 प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचले

पुसदवरून हिंगोलीकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला आज सकाळच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने या अपघातात बसमधील सर्व ४० प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, बस चढावाच्या एका वळणावर अडकल्याने थांबवण्यात आली होती. त्या वेळी वाहनाचे इंजिन तापल्याने चालकाने गाडी थोडी मागे घेतली. मात्र, मागे घेत असताना बसचा तोल सुटला आणि ती रस्त्याच्या कडेला झुकून पलटी होण्याच्या स्थितीत गेली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आणि प्रवाशांनी वेळीच बाहेर पडून आपला जीव वाचवला.
चालकाच्या म्हणण्यानुसार, तीव्र उष्णतेमुळे गाडीचं इंजिन तापलं होतं आणि त्यामुळेच चढावावर गाडी थांबली होती. बसमध्ये एकूण ४० प्रवासी प्रवास करत होते. घटनेनंतर सर्व प्रवाशांना इतर एसटी बसद्वारे सुरक्षितरित्या हिंगोलीकडे रवाना करण्यात आले आहे.
स्थानिक पोलीस आणि एसटी प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, अपघाताच्या अधिक तपासाची कार्यवाही सुरू आहे.



