अमरावतीतील आदर्श जोडप्याचा लग्नाच्या ५१ व्या वाढदिवसाला सन्मान,समाजसेवे साठीचा गौरव
अमरावती : समाजकार्य, शांत जीवनशैली आणि निष्ठावान सहजीवनाचे उत्तम उदाहरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरुषोत्तमजी मुंदडा आणि रेखाताई मुंदडा यांच्या 51 व्या विवाहवर्षगाठचा उत्सव आज अमरावती शहरात साजरा करण्यात आला.
वरिष्ठ समाजसेवी व बुलीदान राठी मूक विद्यालयाचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तमजी मुंदडा आणि त्यांच्या पत्नी रेखाताई यांचा विवाहप्रवास यंदा 51 वर्षांच्या सोहळ्यात पदार्पण करत आहे. या खास प्रसंगी अभिनंदन पेंढारी मित्र परिवाराने त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ, मोत्यांची माला, सन्मानपत्र आणि शुभेच्छा भेट दिल्या.
कार्यक्रमात दीपक हुंडीकर, अनिल सुराणा, जगदीश सायसिकमल, मनीष पावडे, गणेश भोरे, अरुण बनारसे, महेंद्र देशमुख, सौ. अंजली पाठक आणि सौ. मनीषा पावडे यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या दांपत्याला त्यांच्या जीवनातील योगदानाबद्दल शुभेच्छा दिल्या. उपस्थितांनी ‘त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही समाजकार्य करत आलो आहोत. त्यांचे जीवन हे प्रेरणास्रोत आहे,’ असे सांगून त्यांचा सन्मान केला.
पुरुषोत्तमजी मुंदडा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “जीवनात आपुलकी, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हाच खरा आनंद आहे. नव्या पिढीनेही सामाजिक दायित्वाचे भान राखावे.”
या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन अभिनंदन पेंढारी यांनी केले. आभारप्रदर्शन मनीष पावडे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप हलक्या नाश्त्याने झाला.



