अकोला उड्डाणपुलावर भीषण अपघात; दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू

अकोला : अकोला शहरातील नवीन उड्डाणपुलावर आज सकाळी एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. संतोष वनवासे (वय 25), उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून, तो गेल्या काही वर्षांपासून अकोल्यात पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करीत होता.
प्राप्त माहितीनुसार, संतोष यांची दुचाकी पुलावरून जात असताना अचानक घसरली आणि थेट पुलाच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या भिंतीवर आदळली. अपघात एवढा भीषण होता की भिंतीवर जोरदार धडक बसल्याने त्याच्या नाकातून आणि कानातून रक्तस्राव होऊ लागला. हे पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत संतोष यांचा जागीच मृत्यू झाला होता.
अपघातानंतर काही काळासाठी पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

