दोन ट्रकची समोरासमोर धडक, एक ट्रक पुलावरून कोसळला; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
नांदेड – किनवट राष्ट्रीय महामार्गावर इस्लापूर जवळील हरणखरब खोलानाला पुलावर भीषण अपघाताची घटना घडली. दोन भरधाव ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने एक ट्रक थेट पुलावरून खोल दरीत कोसळला, तर दुसरा ट्रक पुलाच्या कठड्यावर अडकला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
या भीषण अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील ईश्वर कोल्हे, मंगेश पवार, आणि गनाथ बुटले हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातात किनवट तालुक्यातील पांगरी येथील शंकर मुतकूलवाड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरातील स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत दोन्ही ट्रकचालकांना बाहेर काढले आणि जीव वाचवण्यात यश मिळवलं. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.



