अकोला जिल्ह्यातील हातगावात धाडसी दरोडा! घरमालकाचा हृदयविकाराने मृत्यू
अकोला : अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव गावात रविवारी संध्याकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला. अज्ञात दरोडेखोरांनी एका शेतकरी कुटुंबावर दरोडा टाकत लाखो रुपयांची रोख रक्कम आणि सोनं लुटलं. दरोड्याच्या धक्क्याने घरमालकाचा मृत्यू झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय.
अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव गावात रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडलेल्या धाडसी दरोड्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशोक नामदेवराव बोळे यांच्या घरी अज्ञात दरोडेखोरांनी लाखो रुपयांची रोख रक्कम आणि तब्बल 65 ग्राम सोन्याचे दागिने लुटले आहेत. दरोडेखोरांनी संपूर्ण घरातील सामानाची उचकापाचक केली आणि दहशतीचं वातावरण तयार करत आपला उद्देश साधला. घटनेचा धक्का एवढा तीव्र होता की घरमालक अशोक बोळे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मूर्तिजापूर शहरासह तालुक्यात नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. अशा घटना सातत्याने घडत असून, चोरटे जणू पोलीस यंत्रणेला खुलेआम आव्हान देत असल्याचं चित्र आहे. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे.
“अशा घटना केवळ मालमत्तेचं नुकसान करत नाहीत, तर कुटुंबांचं संपूर्ण आयुष्य हादरवून टाकतात. हातगावातील या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. आता हे पाहावं लागेल की आरोपी लवकर गजाआड जातात का, की चोरटे पुन्हा दुसऱ्या घराची लूट करतात.”



