छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून, मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयात ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनीचे आयोजन

मोर्शी: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून, भारतीय महाविद्यालय मोर्शीच्या इतिहास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शनीला इतिहासप्रेमी आणि विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
‘इतिहासाचे मुक साक्षीदार, विदर्भाचे शस्त्रागार’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनाचे आयोजन ४ एप्रिल २०२५ रोजी झाले. प्रदर्शनात तलवारी, भाले, ढाल, बंदुका, शिवकालीन शस्त्रांची प्रतिकृती आणि इतर पारंपरिक हत्याऱ्यांचे जतन व माहितीपूर्ण सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. संतोष खांडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, मोर्शी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अनंतराव सोमवंशी, सरचिटणीस, भारतीय विद्या मंदिर, अमरावती होते. विशेष अतिथी म्हणून प्रशांत भागवतकर, नितीन देशमुख, पंकज पाटमासे, शिवा काळे, श्रीकांत देशमुख, डॉ. भीमराव चंदनकर, संदीप रोडे आणि श्रीकांत सिनकर यांनी उपस्थिती दर्शवली.
प्रदर्शनाला मोर्शी परिसरातील अनेक शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि संशोधक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी इतिहासाच्या वस्तू प्रत्यक्ष पाहून अनुभवला आणि अभ्यासाला नवीन दृष्टिकोन मिळवला. या यशस्वी कार्यक्रमासाठी स्वराज्य सेवा प्रतिष्ठान, चांदूर बाजार यांचे विशेष सहकार्य लाभले. प्राचार्य डॉ. संतोष आगरकर यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले आणि विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबाबत जागरुकता वाढल्याचे नमूद केले.



