citynewsCrime Newskalyanlatestnewss breakingnews

मुंबई लोकलमध्ये धावत्या ट्रेनमध्ये थरार! बिडी ओढण्यास विरोध केल्याने प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला

ठाकुर्ली स्थानकादरम्यान तीन तरुणांकडून भरत टोपले यांच्यावर वार; प्रवासी गंभीर जखमी, हल्ल्यानंतर आरोपी फरार

कल्याण : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धावत्या लोकलमध्ये बिडी ओढण्यास विरोध केल्याच्या कारणावरून एका प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात भरत टोपले हे गंभीर जखमी झाले असून, हल्ला करणारे तिन्ही तरुण घटनास्थळावरून पसार झाले आहेत. ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास कसारा लोकलमध्ये हा प्रकार घडला. उल्हासनगर येथे राहणारे भरत टोपले हे लोकलने प्रवास करत होते. यावेळी लोकलमधील तीन तरुण बिडी ओढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी संबंधित तरुणांना बिडी ओढण्यास विरोध केला.

मात्र, हा विरोध तिन्ही तरुणांना खटकला. यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि वादाचे रूपांतर थेट हिंसक हल्ल्यात झाले. संतापलेल्या तरुणांनी भरत टोपले यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे लोकलमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या हल्ल्यात टोपले गंभीर जखमी झाले.

हल्ल्यानंतर तिन्ही आरोपींनी लोकलमधून पळ काढला. जखमी भरत टोपले यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, किरकोळ कारणावरून प्रवाशावर थेट धारदार शस्त्राने हल्ला होण्याच्या या घटनेने मुंबई लोकलमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आव्हान रेल्वे पोलिसांसमोर आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button