
कॉकरोज जनता पार्टीच्या टीमची कळंब तालुक्यातील धोत्रा गावाला भेट; ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजूर वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या
यवतमाळ : ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजूर वर्गाच्या समस्या, अडचणी व त्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी अभिजीत दिपके, आशुतोष राका आणि कॉकरोज जनता पार्टीच्या (CJP) टीमने यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील धोत्रा गावाला भेट दिली. यावेळी गावातील शेतमजुरांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या, तर शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

या भेटीदरम्यान गावातील मजूर वर्गाशी चर्चा करून त्यांना कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या, रोजगाराची परिस्थिती आणि दैनंदिन जीवनातील अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ग्रामीण भागातील कष्टकरी वर्गाला कोणत्या परिस्थितीत काम करावे लागते, याची माहिती टीमने प्रत्यक्ष संवादातून घेतली.
त्यानंतर गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतीची पाहणी करण्यात आली. शेती करताना शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, शेतीची सद्यस्थिती आणि ग्रामीण भागातील कृषी क्षेत्रासमोरील प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांच्या समस्या आणि अनुभव जाणून घेण्यावर यावेळी भर देण्यात आला.
केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता गावात प्रत्यक्ष जाऊन शेतकरी आणि शेतमजुरांशी संवाद साधण्याच्या माध्यमातून त्यांच्या परिस्थितीची माहिती घेण्याचा प्रयत्न कॉकरोज जनता पार्टीच्या टीमने केला. या भेटीतून ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी आणि मजूर वर्गाचे प्रश्न समजून घेण्यावर भर देण्यात आला.
सिटी न्यूजसाठी यवतमाळ येथून दुर्गेश कान्हु यांचा रिपोर्ट.



