नागपुरात ठेलेवाल्याकडे महिन्याला १० हजारांची खंडणी मागितली! चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी; तहसील पोलिसांत गुन्हा दाखल

मोमिनपुरा येथील एमएल कॅन्टीनसमोरील नाश्त्याच्या ठेलेवाल्याला आरोपीची धमकी; पैसे न दिल्यास व्यवसाय करू देणार नसल्याचा इशारा, आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू
नागपूर : शहरात रस्त्यावरील छोट्या व्यावसायिकांकडून दहशतीच्या जोरावर पैशांची मागणी करण्याचा प्रकार समोर आला आहे. मोमिनपुरा परिसरातील एमएल कॅन्टीनसमोर नाश्त्याचा ठेला लावणाऱ्या व्यावसायिकाकडे एका तरुणाने दरमहा १० हजार रुपयांची मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने चाकूचा धाक दाखवत ठेला लावू न देण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात खंडणी व धमकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद आतिफ अली ऊर्फ सय्यद अब्दुल हनीफ (वय २४, रा. एमएल कॅन्टीनजवळ, मोमिनपुरा) हे एमएल कॅन्टीनसमोर नाश्त्याचा ठेला लावून व्यवसाय करतात. एतेश्याम रफीक खान ऊर्फ बहरा (वय अंदाजे २६, रा. चोडी गल्ली) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीने फिर्यादीकडे नशापाणी करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, एवढी मोठी रक्कम सध्या आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगत फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला. यावरून आरोपीने चाकू काढून फिर्यादीला धमकावल्याचा आरोप आहे. तुला या ठिकाणी ठेला लावायचा असेल तर दरमहा १० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा येथे व्यवसाय करू देणार नाही आणि तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेनंतर फिर्यादीने तहसील पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अपराध क्रमांक ७३२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२), ३०८(५), ३५१(२) आणि ३५१(३) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
आरोपीचा पूर्वीही चोरीच्या गुन्ह्यात सहभाग
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी एतेश्याम रफीक खान ऊर्फ बहरा हा यापूर्वीही गुन्हेगारी प्रकरणात पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. त्याच्याविरुद्ध गणेशपेठ पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू असून, लवकरच त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



