Amravati GramincitynewsLatest NewsMaharashtra

मूर्तिजापूरमध्ये दहा महिन्यांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप

सलाईनमधून इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती बिघडल्याचा पालकांचा दावा; ओव्हरडोस किंवा चुकीचे औषध दिल्याचा संशय व्यक्त

मूर्तिजापूर : अवघ्या दहा महिन्यांच्या चिमुकलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मूर्तिजापूरमध्ये खळबळ उडाली आहे. सर्दी, खोकला आणि छातीत कफाचा त्रास असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या खुशी जाधव या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सलाईनमधून पिवळ्या रंगाचे इंजेक्शन दिल्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील अवघाते बाल रुग्णालयात ही घटना घडली. कारंजा तालुक्यातील रामगाव रामेश्वर येथील रहिवासी अंजली आणि अजय जाधव यांच्या दहा महिन्यांच्या खुशीला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. छातीत कफ झाल्याने १९ नोव्हेंबर रोजी तिला मूर्तिजापूर येथील अवघाते बाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती बिघडल्याचा नातेवाईकांचा आरोप

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, २० नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास खुशीची प्रकृती ठीक असल्याचे दिसत होते. मात्र, रुग्णालयातील परिचारिकेने सलाईन लावल्यानंतर त्यामध्ये पिवळ्या रंगाचे इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन दिल्यानंतर खुशीने अचानक हातपाय वाकडे केले आणि काही क्षणांतच तिचा मृत्यू झाला, असा दावा नातेवाईकांनी केला आहे.

या घटनेनंतर पालकांनी उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, चिमुकलीला ओव्हरडोस किंवा चुकीचे औषध देण्यात आले होते का, असा संशय व्यक्त केला आहे. मात्र, सलाईनमधून नेमके कोणते औषध देण्यात आले आणि त्यानंतर प्रकृती का बिघडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

डॉक्टरांनी काय सांगितले?

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत अवघाते यांनी सांगितले की, दहा महिन्यांच्या बाळाला निमोनिया झाल्याने गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारीही बाळाची प्रकृती ठणठणीत होती. मात्र, दुपारी अचानक प्रकृती बिघडली. बाळाला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्यात यश आले नाही.

तसेच मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी बाळाचे शवविच्छेदन करण्याबाबत नातेवाईकांना सांगण्यात आले होते. मात्र, नातेवाईकांनी त्याला विरोध केल्याचे डॉ. अवघाते यांनी स्पष्ट केले.

निष्पक्ष चौकशीची मागणी

चिमुकलीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेत उपचारादरम्यान काही निष्काळजीपणा झाला होता का, औषधांची मात्रा योग्य होती का आणि मृत्यूचे नेमके कारण काय, या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.

दरम्यान, शवविच्छेदनाला नातेवाईकांनी विरोध केल्याने मृत्यूचे वैद्यकीय कारण स्पष्ट होण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. आता या प्रकरणात पोलीस आणि आरोग्य विभाग काय भूमिका घेतात, तसेच रुग्णालयातील उपचार पद्धतीची चौकशी होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button