नागपूरच्या आकाशात भारतीय वायुसेनेच्या शौर्याचा थरार! सूर्यकिरण टीमच्या हवाई कसरतींनी प्रेक्षक मंत्रमुग्ध

सुखोई-३० एमकेआयचे शानदार प्रदर्शन; सारंग, आकाश गंगा आणि गरुड स्पेशल फोर्सच्या कौशल्याने एअर शोची रंगत वाढवली
नागपूर : नागपूरच्या आकाशात भारतीय वायुसेनेच्या शौर्याचा, सामर्थ्याचा आणि अद्भुत हवाई कौशल्याचा थरार अनुभवायला मिळाला. दोन दिवसीय एअर फेस्टिव्हलला नागपुरात सुरुवात झाली असून, भारतीय वायुसेनेच्या विविध पथकांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या एअर शोमध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या चित्तथरारक हवाई कसरती विशेष आकर्षण ठरल्या. आकाशात वेगवेगळ्या रचना साकारत वैमानिकांनी आपल्या अचूक समन्वयाचे आणि कौशल्याचे दर्शन घडवले.

सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीमनेही हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली. आकाश गंगा स्कायडायव्हिंग टीमच्या धाडसी कामगिरीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले, तर गरुड स्पेशल फोर्सच्या जवानांनी आपल्या विशेष कौशल्याचे प्रदर्शन केले.
या एअर फेस्टिव्हलचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे सुखोई-३० एमकेआय हे लढाऊ विमान. भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्याचे दर्शन घडवणाऱ्या या विमानाच्या प्रदर्शनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
दरम्यान, उद्या २२ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या एअर फेस्टिव्हलमध्ये केवळ निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात आला आहे.
भारतीय वायुसेनेचे शौर्य, शिस्त, आधुनिक तंत्रज्ञान आणि वैमानिकांचे कौशल्य अनुभवण्याची संधी या एअर फेस्टिव्हलच्या माध्यमातून नागपूरकरांना मिळाली. त्यामुळे हा हवाई सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.



