citynewsLatest NewsMaharashtraNashik

नाशिकच्या प्रसिद्ध मिसळ हॉटेल्सवर FDA ची कारवाई; शामसुंदरसह पाच आस्थापनांना टाळे

अस्वच्छता, किटकांचा प्रादुर्भाव आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्याने कारवाई; चार हॉटेल्सचे परवाने आणि एका आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित

नाशिक : देशभरात प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या मिसळवर आता अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांच्या तपासणीत अस्वच्छता, किटकांचा प्रादुर्भाव तसेच मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आल्याने पाच आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शामसुंदर हॉटेलचाही समावेश असल्याची माहिती आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रशासनाच्या पथकांनी १९ नोव्हेंबर रोजी नाशिक शहरातील विविध हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांची तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी आढळून आल्या.

अन्न तयार करण्याच्या ठिकाणी अस्वच्छता, किटकांचा प्रादुर्भाव, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आणि स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी मुदतबाह्य अन्नपदार्थही आढळून आले. संबंधित आस्थापनांकडून अन्न सुरक्षा व मानके नियम २०११ मधील अनुसूची-४ चे उल्लंघन झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चार हॉटेल्सचे अन्न सुरक्षा परवाने आणि एका आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित केले आहे. त्यामुळे संबंधित पाच आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

नाशिकची मिसळ खाण्यासाठी दर रविवारी नागरिकांसह पर्यटकांची विविध हॉटेल्समध्ये मोठी गर्दी असते. मात्र, खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत आणि स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांची तपासणी सुरू असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button