नागपुरात वाहनचोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; दोन मोपेड जप्त

डुप्लिकेट चावीच्या मदतीने वाहनांची चोरी; पाचपावली पोलिसांची कारवाई, ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
नागपूर : शहरातील वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या गस्ती आणि तपासादरम्यान पाचपावली पोलिसांच्या पथकाने एका सराईत वाहनचोराला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या दोन मोपेड वाहने जप्त करण्यात आली असून, या वाहनांची एकूण किंमत ५५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पाचपावली पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अंमलदार विनोद समुद्रे आणि त्यांची टीम पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक संशयित इसम आढळून आला. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव आदित्य उर्फ गब्बर उर्फ दिल्ली विकास बब्बर (वय २४, रा. लष्करीबाग/वारसे नगर, पाचपावली) असे सांगितले.
पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या दोन मोपेड वाहनांबाबत चौकशी केली असता, ती वाहने चोरीची असल्याचे समोर आले. या वाहनांबाबत पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेला आदित्य हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. वाहनचोरीसाठी तो डुप्लिकेट चावीचा वापर करीत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. डुप्लिकेट चावीच्या साहाय्याने वाहन सुरू करून ते चोरी करून नेण्याची त्याची कार्यपद्धती असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास पाचपावली पोलीस करीत असून, त्याने आणखी किती वाहनांची चोरी केली आहे का, याचा शोध घेतला जात आहे.



