अमरावतीत डॉक्टरांचा भव्य क्रीडा महाकुंभ! १५ राज्यांतील १२०० हून अधिक डॉक्टरांचा सहभाग; १५ क्रीडा प्रकारांतून फिटनेसचा संदेश

IMA अमरावतीच्या पुढाकाराने २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान आयोजन; क्रिकेट, बॅडमिंटन, सायकलिंगसह विविध स्पर्धांची रंगत
अमरावती : डॉक्टर म्हटले की रुग्णांवर उपचार करणारे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर येते. मात्र, रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी राहावे, या उद्देशाने अमरावतीत भव्य क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) अमरावतीच्या वतीने डॉ. वसंत लुंगे यांच्या नेतृत्वाखाली २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महाकुंभात देशभरातील १५ हून अधिक राज्यांमधील १२०० पेक्षा अधिक डॉक्टर सहभागी झाले आहेत. क्रिकेटपासून बॅडमिंटन, टेबल टेनिस, सायकलिंग आणि मॅरेथॉनपर्यंत तब्बल १५ विविध क्रीडा प्रकारांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत डॉक्टर आपले क्रीडा कौशल्य आणि फिटनेस दाखवताना दिसत आहेत.

या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना IMA चे डॉ. सिकंदर आडवाणी यांनी सांगितले की, डॉक्टरांचे काम केवळ रुग्णांवर उपचार करण्यापुरते मर्यादित नसून त्यांनी स्वतःच्या आरोग्याची आणि फिटनेसचीही काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. याच विचारातून या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील डॉक्टरांचा मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.
विविध क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश या महाकुंभातून दिला जात आहे. डॉक्टरांनी स्वतः मैदानावर उतरून दिलेला फिटनेसचा संदेश समाजातील प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारावा, असे आवाहनही डॉ. सिकंदर आडवाणी यांनी केले आहे.
आरोग्यसेवेबरोबरच क्रीडा आणि फिटनेसची जोड देणाऱ्या या उपक्रमामुळे अमरावतीला राष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय क्षेत्रातील क्रीडा स्पर्धांचे व्यासपीठ मिळाले आहे.



