AmravaticitynewsCrime Newslatestnewss breakingnews

फिनले मिलच्या टाळेबंदीचा कामगारांना मानसिक आणि आर्थिक फटका! तीन दिवसांत दोन कामगारांची आत्महत्या; सहा वर्षांत १८ जणांनी संपवले जीवन

थकीत वेतन आणि सहा वर्षांचा बोनस अद्याप प्रलंबित; २९ महिन्यांचे ५० टक्के, तर १९ महिन्यांचे १०० टक्के वेतन बाकी असल्याचा कामगारांचा दावा, गिरणी कामगारांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट

अमरावती : शहरातील बंद असलेल्या फिनले मिलच्या पुनरुज्जीवनाची प्रतीक्षा दिवसेंदिवस लांबत असताना, या मिलमधील कामगारांच्या आयुष्यात मात्र आर्थिक संकट अधिकच गडद होत चालले आहे. थकीत वेतन, बोनस आणि रोजगाराचा प्रश्न सुटत नसल्याने कामगार व त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. याच पार्श्वभूमीवर अवघ्या तीन दिवसांत दोन माजी मिल कामगारांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मिल बंद झाल्यापासून गेल्या सहा वर्षांत तब्बल १८ कामगारांनी आत्महत्या केल्याचा दावा गिरणी कामगार संघटनेकडून करण्यात येत असून, या घटनांमुळे कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गुरुवारी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास बेगमपुरा परिसरातील ३२ वर्षीय युवकाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. विजय नारायणराव हडाले (वय ३२, रा. बेगमपुरा) असे मृत कामगाराचे नाव आहे. विजय हे सहा वर्षांपूर्वी बंद झालेल्या फिनले मिलच्या वाइंडिंग विभागात कार्यरत होते. मिल बंद पडल्यानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी ऑटोरिक्षा चालविण्यास सुरुवात केली होती. मात्र, मिल पुन्हा सुरू होईल आणि आपले रोजगाराचे दिवस परत येतील, या आशेवर ते होते. दरम्यान, वाढता कौटुंबिक खर्च आणि आर्थिक अडचणींमुळे ते विवंचनेत असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सकाळी त्यांनी राहत्या घरातील बाथरूममध्ये गळफास घेऊन जीवन संपवले.

यापूर्वी मंगळवारी अचलपूर येथील सरमसपुरा परिसरात राहणारे ४५ वर्षीय मिल कामगार सुनील रामदास दाभाडे यांनीही दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीत दोन मिल कामगारांच्या आत्महत्येच्या घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

थकीत वेतन आणि बोनसचा प्रश्न कायम

फिनले मिल बंद झाल्यापासून कामगारांच्या आर्थिक देण्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेश ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार, कामगारांना मागील सहा वर्षांचा बोनस मिळालेला नाही. तसेच मागील २९ महिन्यांतील ५० टक्के वेतन थकीत असून, चालू १९ महिन्यांचे १०० टक्के वेतनही अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे कामगारांना त्यांच्या हक्काच्या आर्थिक मोबदल्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात येत आहे.

एकीकडे मिल सुरू होण्याबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसत नसताना दुसरीकडे कामगारांच्या थकीत देण्यांचाही प्रश्न मार्गी लागत नसल्याने त्यांच्या कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्यावरील खर्च आणि दैनंदिन गरजा भागविताना अनेक कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोजगाराचे साधन हिरावले गेल्याने अनेक कामगारांना पर्यायी कामांचा आधार घ्यावा लागत आहे.

१८ कामगारांच्या आत्महत्यांचा दावा; प्रशासनाने दखल घेण्याची मागणी

मिल बंद झाल्यापासून सहा वर्षांच्या कालावधीत आतापर्यंत १८ कामगारांनी आत्महत्या केल्याचा दावा गिरणी कामगार संघटनेकडून करण्यात आला आहे. सलग दोन कामगारांच्या आत्महत्यांमुळे हा प्रश्न केवळ रोजगारापुरता मर्यादित राहिलेला नसून कामगारांच्या आर्थिक सुरक्षिततेशी आणि सामाजिक भवितव्याशी जोडला गेला आहे.

फिनले मिल पुन्हा सुरू करण्याबाबत ठोस निर्णय घेण्यासोबतच कामगारांचे थकीत वेतन, बोनस आणि इतर आर्थिक देणी तातडीने देण्यात यावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे. कामगारांच्या प्रश्नांकडे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button