BuldhanacitynewsFarmersCrisis

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार थेट संवाद! मेहकरमध्ये शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी

डी.पी. रोडवर हजारो शेतकरी आणि लाडक्या बहिणींची उपस्थिती; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून सहा महिन्यांचे वेतन दुष्काळग्रस्तांच्या मदतनिधीसाठी देण्याची घोषणा

मेहकर : बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या, व्यथा आणि अडचणी जाणून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज, शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी मेहकर येथे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. मेहकर येथील डी.पी. रोडवर आयोजित करण्यात आलेल्या या शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, कार्यक्रमस्थळी हजारो शेतकरी आणि लाडक्या बहिणींनी उपस्थिती लावली आहे.

दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेळाव्यात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे आणि शासनाकडून मिळणाऱ्या संभाव्य मदतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गुरुवारी कार्यक्रमस्थळाची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. मेळाव्याला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या मेळाव्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सहा महिन्यांचे वेतन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतनिधीसाठी देण्याची घोषणा केली आहे. ही मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

त्यामुळे आजच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय भूमिका मांडतात आणि दुष्काळग्रस्तांसाठी कोणत्या मदतीची घोषणा करतात, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

सिटी न्यूजसाठी मेहकर येथून गजानन राऊत यांचा रिपोर्ट.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button