AmravatiAmravati Policscitynewslatestnewss breakingnews

अमरावती ग्रामीण पोलिसांची अवैध धंद्यांवर धडक! शेतात गांजाची लागवड उघड, १४.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त; अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टरही पकडला

‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; चिखलदरा तालुक्यात गांजाची ३७ झाडे जप्त, तर धामणगाव रेल्वे तालुक्यात चंद्रभागा नदीपात्रातून रेती उत्खनन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

अमरावती : अमरावती ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली आहे. चिखलदरा तालुक्यातील शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आणत पोलिसांनी तब्बल ३७ गांजाची झाडे जप्त केली आहेत. या गांजाची अंदाजे किंमत १४ लाख ५६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या कारवाईत धामणगाव रेल्वे तालुक्यातील सोनगाव येथील चंद्रभागा नदीपात्रातून अवैधरीत्या रेती उत्खनन करून वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला आहे.

पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार २६ नोव्हेंबर रोजी अमरावती ग्रामीण पोलिसांनी या दोन्ही कारवाया केल्या.

शेतात गांजाची लागवड; १४.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पहिल्या कारवाईत चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुलंगणा खुर्द परिसरात गांजाची लागवड होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित शेतात छापा टाकला. यावेळी राजाराम ठाकूर धिकार (वय ४५, रा. कुलंगणा, ता. चिखलदरा, जि. अमरावती) याने आपल्या शेतात गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले.

शेतातील झाडांची पाहणी केली असता, इतर पिकांमध्ये गांजाची मोठी झाडे लपवून लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. वनस्पतींचे वर्णन, रंग, गंध आणि गुणधर्म तपासल्यानंतर त्या गांजाची असल्याची खात्री पोलिसांना झाली. या कारवाईत लहान-मोठी एकूण ३७ गांजाची झाडे जप्त करण्यात आली. त्यांचे एकूण वजन २९ किलो १२० ग्रॅम असून, बाजारमूल्य अंदाजे १४ लाख ५६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध चिखलदरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(ब), २०(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रभागा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन; ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त

दुसऱ्या कारवाईत मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनगाव खर्डा येथील चंद्रभागा नदीपात्रातून अवैधरीत्या रेती उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, सोनालिका कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक MH 32 P 3828 आणि विनानंबरची ट्रॉली यामध्ये रेती भरून वाहतूक केली जात असल्याचे आढळले.

पोलिसांनी हा ट्रॅक्टर आणि ट्रॉली ताब्यात घेतली. या प्रकरणात मुकेश विष्णुजी नेवारे (वय ३२, रा. सोनगाव, ता. धामणगाव रेल्वे) याच्यासह ट्रॅक्टरमालक आकाश सतीशराव गायकवाड (रा. सोनगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२), ३(५), तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम ९, १५ आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियमातील कलम ३, ७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

या दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक निकेतन कदम आणि अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात तसेच संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने या कारवायांमध्ये सहभाग घेतला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button