
दुग्ध व्यवसाय आणि शेळीपालनातून उत्पन्नवाढीचे धडे; मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा लाभ घेण्याचे पशुपालकांना आवाहन
गोंदिया : पारंपरिक शेतीसोबत पशुपालनाची जोड देऊन शेतकऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, तसेच दुग्ध व्यवसाय आणि शेळीपालनाच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करावेत, या उद्देशाने गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे पशुपालकांसाठी विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पशुपालन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, जनावरांचे आरोग्य, चारा व्यवस्थापन आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती या मेळाव्यातून देण्यात आली. विशेषतः मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा लाभ घेऊन तरुणांनी पशुपालनाला व्यावसायिक स्वरूप द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
संविधान दिन आणि राष्ट्रीय दुग्ध दिनाचे औचित्य साधून तालुका पशुचिकित्सालय, सडक अर्जुनी आणि इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती, सडक अर्जुनी येथे या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सभापती चेतन वडगाये यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसभापती निशा काशिवार, शालिंदर कापगते, अल्लाउद्दीन राजानी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांनी पशुपालकांना दुग्ध व्यवसाय आणि शेळीपालनासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. जनावरांचे योग्य संगोपन, वेळेवर लसीकरण, आरोग्याची काळजी, संतुलित आहार, चारा व्यवस्थापन तसेच शास्त्रशुद्ध पशुपालनाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. पशुपालन व्यवसायात नियोजन आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर डॉ. सौरभ कवठे यांनी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची सविस्तर माहिती देत या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या संधींबाबत पशुपालकांना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील युवक आणि शेतकऱ्यांनी शासकीय योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा आणि पशुपालनाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची संधी निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतीला दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आणि इतर पशुपालन व्यवसायांची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासोबतच युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होऊ शकतात, हा महत्त्वपूर्ण संदेश या मेळाव्यातून देण्यात आला.
या मार्गदर्शन मेळाव्याला परिसरातील तरुण पशुपालक आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पशुपालन व्यवसाय अधिक फायदेशीर आणि शास्त्रशुद्ध करण्यासाठी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांची ग्रामीण भागात गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
गोंदिया सिटी न्यूज | सुधीर शिवणकर



