citynewsGondia

स्मशानभूमीवर अतिक्रमणाचा विळखा! ९५ वर्षीय वृद्धेच्या दफनविधीलाही जागा मिळेना; दोन तास मृतदेह अडकला!

सडक अर्जुनी तालुक्यातील शिंदीपार येथील संतापजनक प्रकार; दफनविधीला विरोध झाल्याने ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा, पोलीस व महसूल प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर अखेर अंत्यसंस्कार

सडक अर्जुनी (गोंदिया) : माणसाच्या मृत्यूनंतर तरी त्याला सन्मानाने अखेरचा निरोप मिळावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र, सडक अर्जुनी तालुक्यातील शिंदीपार येथे स्मशानभूमीच्या जागेवरून निर्माण झालेल्या वादामुळे एका ९५ वर्षीय वृद्ध महिलेचा दफनविधीच रोखण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल दोन तास मृतदेह दफनविधीसाठी अडकून पडल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.

शिंदीपार गावातील स्मशानभूमीसाठी राखीव असलेल्या गट क्रमांक २८८ मधील शासकीय जागेवर अतिक्रमण करून शेती केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या जागेवर ९५ वर्षीय वृद्ध महिलेचा दफनविधी करण्यासाठी ग्रामस्थ गेले असता त्याला विरोध करण्यात आला. त्यामुळे गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि अंत्यसंस्काराची प्रक्रिया खोळंबली.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी नायब तहसीलदारांनी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली. वनहक्क पट्ट्याची जागा गट क्रमांक १३२ मध्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर प्रशासनाच्या हस्तक्षेपाने जेसीबीच्या सहाय्याने दफनविधीसाठी खड्डा खोदण्यात आला. अखेर दुपारी १.३० वाजता ९५ वर्षीय वृद्ध महिलेचा दफनविधी पार पडला.

मात्र, या घटनेने शिंदीपार गावातील स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्मशानभूमीसाठी राखीव असलेल्या शासकीय जागेवर अतिक्रमण होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप असून, याप्रकरणी प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

विशेष म्हणजे, सातबारा आणि जागेच्या मोजणीसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध असल्याचा ग्रामस्थांचा दावा असतानाही स्मशानभूमीच्या जागेवरून वाद निर्माण होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button