नागपुरात प्रेमीयुगुलावर हल्ला; प्रियकराला मारहाण करून १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार

सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलातील धक्कादायक घटना; तरुणीचे मौल्यवान साहित्य हिसकावले, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी फरार
नागपूर : नागपूर शहरातील सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगल परिसरात एका अज्ञात तरुणाने प्रेमीयुगुलावर हल्ला करून १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीने तरुणीच्या प्रियकराला बेदम मारहाण करून तेथून हाकलून दिले आणि त्यानंतर तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमीयुगुल सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगल परिसरात असताना एका अज्ञात तरुणाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. आरोपीने तरुणीच्या प्रियकराला मारहाण करून घटनास्थळावरून पळवून लावले. त्यानंतर तरुणीला लक्ष्य करून तिच्यावर अत्याचार केला.
एवढ्यावरच न थांबता आरोपीने पीडित तरुणीचे मौल्यवान साहित्यही हिसकावून घेतले. तसेच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र, घटनेला ४८ तास उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके तैनात केली असून परिसरातील संभाव्य पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे तपास सुरू आहे.
दरम्यान, सोनेगाव तलावासारख्या वर्दळीच्या परिसरालगत अशा प्रकारची गंभीर घटना घडल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.



