इर्विन रुग्णालय परिसरात महिलेचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळला; डोके, हात-पाय वेगवेगळ्या ठिकाणी!

अमरावतीत खळबळ; भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडल्याचा प्राथमिक अंदाज, घातपाताची शक्यताही तपासाच्या केंद्रस्थानी
अमरावती : अमरावती शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात इर्विन रुग्णालय परिसरात एका महिलेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृतदेहाचे डोके, हात आणि पाय वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील महत्त्वाच्या इर्विन रुग्णालय परिसरात हा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक माहितीनुसार, महिलेच्या मृतदेहाचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत आढळले. मृतदेहाची ही अवस्था पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार, मृतदेहावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून लचके तोडल्यामुळे शरीराची अशी अवस्था झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि मृतदेहाची अशी अवस्था कशी झाली, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे ठाणेदार रोशन शिरसाठ पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा सुरू केला आहे. तसेच मृत महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हा घातपात आहे की महिलेचा मृत्यू अन्य काही कारणामुळे झाला आणि त्यानंतर भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले, याबाबतही तपास केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, शहरातील महत्त्वाच्या जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातच अशी धक्कादायक घटना घडल्याने परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. मृत महिलेची ओळख आणि मृत्यूचे गूढ उकलण्याचे मोठे आव्हान आता कोतवाली पोलिसांसमोर आहे.



