५० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभराच्या बचावकार्याला अपयश!

पंढरपूर तालुक्यातील जाळोली येथील घटना; १३ तासांच्या प्रयत्नांनंतर उष्मतीला बाहेर काढले, मात्र प्राण वाचवण्यात अपयश
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील जाळोली येथे शेतातील बंद बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवार, २२ नोव्हेंबर रोजी रात्रीपासून प्रशासन आणि विशेष बचाव पथकाकडून सुरू असलेले बचावकार्य सोमवारी सकाळी संपले. तब्बल ४५ ते ५० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या उष्मती राहुल गावित या चिमुकलीला बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले; मात्र दुर्दैवाने तिचा जीव वाचू शकला नाही. रात्रभर प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करूनही या चिमुकलीला वाचवता आले नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, उघड्या आणि वापरात नसलेल्या बोअरवेलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, २२ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कांतीलाल नरसाळे यांच्या शेतातील बंद बोअरवेलमध्ये उष्मती पडली. करकंब येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक दोनजवळ ही घटना घडली. उष्मती ही मूळची नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील शिसा गावची रहिवासी होती. तिचे कुटुंब ऊसतोड मजुरीसाठी या परिसरात आले होते. दरम्यान, खेळत असताना ती शेतातील बंद बोअरवेलमध्ये पडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी मदतीसाठी धाव घेतली.
चिमुकली तब्बल ४५ ते ५० फूट खोलवर अडकल्याची माहिती मिळताच करकंब पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे आणि करकंब पोलीस ठाण्याचे प्रभारी योगेश लंगुटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्याहून विशेष बचाव पथकाला पाचारण केले. बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकलीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रात्रभर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी अनेक तास मेहनत घेतली. संपूर्ण गावाचे लक्ष या बचावकार्याकडे लागले होते. चिमुकली सुखरूप बाहेर यावी, यासाठी कुटुंबीयांसह ग्रामस्थ प्रार्थना करत होते.
अखेर सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बचाव पथकाला उष्मतीला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, बाहेर काढल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आणि बचावकार्याची अखेर अत्यंत दुःखद ठरली. रात्रभर सुरू असलेल्या प्रयत्नांनंतरही दीड वर्षांच्या चिमुकलीचे प्राण वाचू शकले नाहीत.
या घटनेने पुन्हा एकदा शेतशिवारातील उघड्या, बंद किंवा वापरात नसलेल्या बोअरवेलच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. अनेक ठिकाणी पाणी न लागल्याने किंवा वापर बंद झाल्याने बोअरवेल उघड्या अवस्थेत सोडल्या जातात. अशा बोअरवेल योग्य पद्धतीने बंद करून सुरक्षित झाकल्या नसल्यास लहान मुलांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.



