citynewsCrime NewsLatur

किनगाव पोलीस ठाण्यात २१ वर्षीय युवकाचा गळफास घेऊन मृत्यू; नातेवाईकांचा ठिय्या

अहिल्यानगरमधून पोलिसांनी घेतले होते ताब्यात; मारहाण आणि मानसिक छळाच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी, दोषींवर कारवाईचे पोलीस अधीक्षकांचे आश्वासन

अहमदपूर (लातूर) : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस ठाण्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या २१ वर्षीय युवकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अमित रमेश चव्हाण (वय २१, रा. मरशिवणी, ता. अहमदपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. रविवारी रात्री पोलिसांनी त्याला अहिल्यानगर येथून ताब्यात घेऊन किनगाव पोलीस ठाण्यात आणले होते. मात्र, सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलीस ठाण्यातील एका खोलीत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणाच्या तपासासंदर्भात किनगाव पोलिसांनी अमित चव्हाण याला अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले होते. २२ नोव्हेंबर रोजी रात्री त्याला किनगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर पुढील पोलीस प्रक्रिया सुरू असतानाच पहाटेच्या सुमारास पोलीस ठाण्यातील एका खोलीत त्याने गळफास घेतल्याचे समोर आले. पोलीस ठाण्याच्या परिसरातच ताब्यातील युवकाचा मृत्यू झाल्याने या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

घटनेची माहिती मिळताच अमितचे नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल झाले. युवकाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांशी चर्चा करून या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि चौकशीत जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांची समजूत काढण्यात आली. अमितचा मृतदेह लातूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, रुग्णवाहिका रवाना होत असतानाही नातेवाईकांनी काही काळ ठिय्या कायम ठेवला. पोलीस अधीक्षकांनी पुन्हा चर्चा केल्यानंतर रुग्णवाहिका लातूरच्या दिशेने रवाना झाली.

दरम्यान, अमितला पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली होती का, त्याच्यावर कोणताही दबाव किंवा मानसिक छळ झाला होता का, तसेच घटना घडली त्या वेळी कर्तव्यावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी नेमके कुठे होते, असे गंभीर प्रश्न नातेवाईकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत. पोलीस ठाण्यातील सुरक्षिततेची व्यवस्था आणि ताब्यातील व्यक्तीवर ठेवण्यात येणाऱ्या देखरेखीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मात्र, मारहाण किंवा मानसिक छळ झाल्याच्या आरोपांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळाची पाहणी आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या चौकशीतूनच मृत्यूमागील नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या युवकाचा पोलीस ठाण्यातच मृत्यू झाल्याने या प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button