लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये ४५ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या; डोक्यावर गंभीर वार करून संपविले जीवन!

चिखलदरा तालुक्यातील धामणी गावातील खळबळजनक घटना; संशयित आरोपी नितेश कासदेकर परतवाडा पोलिसांच्या ताब्यात, फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी
चिखलदरा / प्रतिनिधी :
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातून एक धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे. धामणी गावात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुडी राजमा कासदेकर असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाचे वार करून तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, धामणी गावात ही घटना घडली. या हत्येप्रकरणी नितेश कासदेकर याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत असून, त्याला परतवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लिव्ह-इन रिलेशनशिपमधील वादातून ही घटना घडली का, यासह विविध शक्यतांच्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजय आखरे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या घटनेमुळे धामणी गावासह परिसरात भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आता या हत्येमागील नेमके कारण काय, हत्या कोणत्या परिस्थितीत करण्यात आली आणि या घटनेत आणखी काही बाबी समोर येतात का, याचा शोध परतवाडा पोलीस घेत आहेत. पुढील तपास सुरू असून, पोलीस तपासानंतरच हत्येचे संपूर्ण वास्तव स्पष्ट होणार आहे.



