व्हॉट्सॲपवर बनावट पेमेंट स्क्रीनशॉट पाठवून व्यापाऱ्याला ३.३१ लाखांचा गंडा!

इलेक्ट्रिक वायर खरेदीच्या बहाण्याने कॉपर वायरचा माल लंपास; ऑर्डर एका दुकानाची, माल उतरवला दुसऱ्याच दुकानात; तीन बँक खात्यांत २.८० लाख जमा
नागपूर : ऑनलाइन व्यवहारांमधील फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना नागपुरात व्यापाऱ्याची व्हॉट्सॲपच्या माध्यमातून लाखोंची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. इलेक्ट्रिक वायर खरेदी करण्याच्या बहाण्याने बनावट पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवून तब्बल ३ लाख ३१ हजार ६९८ रुपयांचा कॉपर वायरचा माल पाठवून घेण्यात आला. विशेष म्हणजे, सुरुवातीला एका दुकानाच्या नावाने मालाची ऑर्डर देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात हा माल दुसऱ्याच दुकानात उतरवून घेण्यात आला. या प्रकारामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी राजेश जवाहरलाल बोथरा यांचे फॉर्च्युन मॉल येथे ‘बोथरा इलेक्ट्रिकल’ नावाचे दुकान आहे. तक्रारीनुसार, ३० तारखेला त्यांच्या व्हॉट्सॲपवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने इलेक्ट्रिक वायर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार बोथरा यांनी ३ लाख ३१ हजार ६९८ रुपयांचे कोटेशन तयार करून व्हॉट्सॲपवर पाठवले.
दुसऱ्या दिवशी संबंधित व्यक्तीने पुन्हा संपर्क साधत कोटेशनमधील संपूर्ण रक्कम बँक खात्यात जमा केल्याचा दावा केला. यासाठी त्याने पेमेंट झाल्याचा स्क्रीनशॉटही पाठवला. स्क्रीनशॉटवर विश्वास ठेवून बोथरा यांनी पोर्टलच्या माध्यमातून अस्मिता इलेक्ट्रिकल, काटोल रोड या नावाने माल पाठवण्याची व्यवस्था केली. त्यानुसार बिल तयार करून मोठ्या किमतीचा कॉपर वायरचा माल रवाना करण्यात आला.
मात्र, माल पोहोचवण्याच्या वेळी फसवणुकीचा वेगळाच प्रकार समोर आला. माल स्वीकारणाऱ्या व्यक्तीने पोर्टलवरील वाहतूकदाराला फोन करून माल अस्मिता इलेक्ट्रिकल येथे न उतरवता श्रीकांत इलेक्ट्रिकल, बेसा येथे उतरवण्यास सांगितले. त्यानुसार माल दुसऱ्याच ठिकाणी पोहोचवण्यात आला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशीही बँक खात्यात पैसे जमा न झाल्याने बोथरा यांनी संबंधित व्यक्तीकडे विचारणा केली. त्यावेळी बँकेच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे सांगून संध्याकाळपर्यंत रक्कम जमा होईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, निर्धारित वेळ उलटूनही पैसे जमा झाले नाहीत. पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधित व्यक्तीचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा संशय बोथरा यांना आला.
यानंतर त्यांनी बेसा येथील न्यू नॅशनल इंटरप्रायझेस येथे जाऊन चौकशी केली. तेव्हा दुकानमालकाने सौरव शाही नावाच्या व्यक्तीचा फोन आल्याचे सांगितले. संबंधित व्यक्तीने आपल्याकडे कॉपर वायरचा माल असल्याचे सांगून कमी किमतीत विक्री करण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर सौरव शाही यानेच संबंधित माल दुकानात उतरवून घेतल्याची माहिती दुकानमालकाने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या व्यवहारात सौरव शाही याने तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण २ लाख ८० हजार रुपये जमा केल्याची बाबही समोर आली आहे. यामध्ये आयडीबीआय बँक, आयएफसीआय आणि कर्नाटक बँक लिमिटेडच्या खात्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकारानंतर राजेश बोथरा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बनावट पेमेंट स्क्रीनशॉट तयार करून व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासह संबंधित बँक खात्यांचा व्यवहार, मालाची वाहतूक आणि तो स्वीकारणाऱ्या व्यक्तींच्या भूमिकेचा तपास पोलीस करीत आहेत.
व्यापाऱ्यांनी सावध राहण्याची गरज!
ऑनलाइन व्यवहार करताना केवळ व्हॉट्सॲपवर आलेल्या पेमेंट स्क्रीनशॉटवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. ग्राहकाने पैसे पाठवल्याचा दावा केला तरी प्रत्यक्ष बँक खात्यात रक्कम जमा झाल्याची खात्री केल्याशिवाय माल पाठवू नये. विशेषतः मोठ्या रकमेच्या व्यवहारात ऑर्डर देणारी व्यक्ती, माल स्वीकारणारा पत्ता आणि पेमेंट करणारे खाते यांची पडताळणी करणे आवश्यक आहे. नागपुरातील या घटनेने ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी सावधानतेचा इशारा दिला आहे.



