citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

पब, कॅफे, बार अँड रेस्टॉरंट सावधान! पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर हिचकी बारविरोधात गुन्हा दाखल

न्यू कॉलनीतील पार्क ॲव्हेन्यू बिल्डिंगमध्ये मध्यरात्रीपर्यंत डीजेचा दणदणाट; पोलिसांच्या कारवाईनंतर बार व्यवस्थापनाविरोधात गुन्हा

नागपूर : पब, कॅफे, बार अँड रेस्टॉरंटमध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांविरोधात नागपूर पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशानंतर न्यू कॉलनी परिसरातील हिचकी बार अँड रेस्टॉरंटविरोधात ध्वनीप्रदूषणाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी रात्री मिळालेल्या तक्रारीनुसार, सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील न्यू कॉलनी परिसरातील पार्क ॲव्हेन्यू बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावर असलेल्या हिचकी बार अँड रेस्टॉरंटमध्ये जोरजोरात डीजेचा आवाज सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्तांना मिळाली. या मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आली होती.

पोलिस आयुक्तांनी तक्रारीची दखल घेत एस्कॉर्ट पथकाचे प्रमुख एपीआय भगवान कोळी यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी ध्वनीमापक यंत्राच्या सहाय्याने आवाजाची तीव्रता तपासण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, पार्क ॲव्हेन्यू बिल्डिंग हे निवासी क्षेत्रात येते. बिल्डिंगच्या १३ व्या मजल्यावर टेरेसवर ध्वनीप्रदूषण होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने कारवाई केली. ध्वनीमापक यंत्राद्वारे आवाजाची तीव्रता मोजली असता ती १००.६ डेसिबल इतकी आढळून आली. ही पातळी निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांच्या कारवाईत निदर्शनास आले.

त्यानंतर पोलिसांनी हिचकी बार अँड रेस्टॉरंटमध्ये जाऊन पाहणी केली. तेथे डीजेचा वापर सुरू असल्याचे आढळून आले. डीजे ऑपरेटर दिप शंकरराव मोरे, वय २२ वर्षे, रा. श्रीकृष्ण नगर, वाठोडा याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. तसेच बारचे मॅनेजर अभय विरखेडे यांच्याकडेही विचारणा करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, बारमधील डीजे जप्त करून डीजे ऑपरेटरविरोधात सदर पोलिस ठाण्यात नवीन लागू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

नियमांचे पालन करण्याचे आवाहन

या कारवाईनंतर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी परिसरातील पब, कॅफे, बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांसह डीजे ऑपरेटरांना आवाहन केले आहे.

पब, बार, रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये ध्वनीक्षेपकाचा वापर करताना शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. ध्वनीची मर्यादा ओलांडून नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने आवाज केल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

या कारवाईमुळे गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील पब, बार, कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांना पोलिसांचा स्पष्ट इशारा मिळाला आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस्कॉर्ट पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक भगवान कोळी, पोलीस नाईक/अंमलदार प्रवीणकुमार डहाळे, पोलीस हवालदार अनूप लोलसरे, अश्रफ शेख, सोमेश्वर निळारे, राजेश घोंगडे, नितीन नारे तसेच सदर पोलिस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button