citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात चोरीच्या वाहनांच्या सुट्या भागांचा काळाबाजार उघड!

वाहनचोरी विरोधी पथकाची कपिलनगर परिसरात कारवाई; दोघांना अटक, तब्बल ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : नागपुरात चोरीच्या वाहनांचे सुटे भाग विक्रीसाठी मध्य प्रदेशात पाठवण्याचा प्रकार वाहनचोरी विरोधी पथकाने उघडकीस आणला आहे. कपिलनगर परिसरातून चोरीच्या मोटारसायकली आणि इतर वाहनांचे सुटे भाग ट्रकमध्ये भरून मध्य प्रदेशात विक्रीसाठी पाठवले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून तब्बल ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नागपूर गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली होती की, कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केजीन नगर परिसरातून चोरीच्या वाहनांचे सुटे भाग ट्रकमध्ये भरून मध्य प्रदेशात पाठवण्यात येणार आहेत.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर MH 40 BG 4937 क्रमांकाच्या ट्रकची पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान ट्रकमध्ये वाहनांचे विविध प्रकारचे सुटे भाग आढळून आले.

पोलिसांनी ट्रकमध्ये उपस्थित असलेल्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी आपली नावे मोहम्मद वलीजान अब्दुल मयान आणि मोहम्मद साबीर अब्दुल मन्नान अशी सांगितली. मात्र, ट्रकमधील वाहनांच्या सुट्या भागांबाबत दोघांकडे कोणतेही समाधानकारक कागदपत्रे आढळून आले नाहीत. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.

पुढील चौकशीत चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी नेला जात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून विविध वाहनांचे सुटे भाग, डिक्कीबार तसेच ट्रक असा एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध कपिलनगर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी कपिलनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

चोरीच्या वाहनांचे सुटे भाग नेमके कुठून मिळवले जात होते, या टोळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि मध्य प्रदेशात हा माल कोणाला विकला जाणार होता, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

वाहनचोरीनंतर त्यांचे सुटे भाग करून विक्री करणाऱ्या नेटवर्कवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे चोरीच्या वाहनांच्या अवैध विक्रीला आळा घालण्याच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button