Nagpur

प्रभाग क्रमांक ३७ मध्ये स्वच्छतेचा बोजवारा; सिव्हिल लाईन्समध्ये कचऱ्याचे ढीग

माजी महापौर नंदा जिचकर यांच्या प्रभागातच स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांकडून नियमित कचरा संकलनाची मागणी

नागपूर : सिटी न्यूजच्या माध्यमातून नागपूर शहरातील विविध प्रभागांमधील प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. याच मालिकेतील प्रभाग क्रमांक ३७ मधील ग्राउंड रिपोर्टमध्ये प्रतिष्ठित सिव्हिल लाईन्स परिसरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असल्याचे चित्र समोर आले आहे. रस्त्याच्या कडेला अनेक दिवसांपासून कचरा साचत असल्याने नागरिकांना दुर्गंधी आणि डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात कचरा संकलनाची गाडी येत असली तरी काही ठिकाणी तब्बल आठ-आठ दिवस कचरा उचलला जात नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचत असून, त्यातून दुर्गंधी पसरत आहे. पावसाळ्यात या कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक ३७ मध्ये भाजपचे चार नगरसेवक असल्याचे सांगितले जाते. तसेच हा परिसर माजी महापौर नंदा जिचकर यांच्या प्रभागाशी संबंधित आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित परिसरातच स्वच्छतेची अशी परिस्थिती असेल, तर शहरातील इतर भागांमधील स्वच्छतेच्या व्यवस्थेची स्थिती काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सिटी न्यूजच्या ग्राउंड रिपोर्टमधून समोर आलेल्या या परिस्थितीकडे महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नियमित कचरा संकलनाची व्यवस्था करावी, तसेच रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा तत्काळ हटवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, सिव्हिल लाईन्ससारख्या प्रतिष्ठित परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न महापालिका प्रशासन कधी सोडवणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. नागरिकांच्या समस्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्यासाठी सिटी न्यूजचा ग्राउंड रिपोर्टचा हा प्रयत्न पुढेही सुरू राहणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button