AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

कोरडा दुष्काळ जाहीर करा; अन्यथा पूर्ण नग्न आंदोलनाचा तुपकरांचा इशारा

अमरावती आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांसह सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

अमरावती | प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून अमरावतीत रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी तुपकर आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत सरकारचा निषेध केला. मागणी तातडीने मान्य न झाल्यास यापुढे पूर्ण नग्न आंदोलन करण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

अमरावतीच्या आयुक्त कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलन करण्यात आले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात रविकांत तुपकर यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. अर्धनग्न आंदोलन करत आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

शेतकऱ्यांच्या शेतीवर कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीपिकांवर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी आंदोलकांनी केली. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये, अशी भूमिका तुपकरांनी आंदोलनादरम्यान मांडली.

सरकार डरती है, पोलीस को आगे करती है

आंदोलनाच्या वेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकार डरती है, पोलीस को आगे करती है अशा घोषणांनी आयुक्त कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. यावेळी आंदोलकांनी सरकारचा जाहीर निषेध केला.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले.

मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सरकारने मान्य केली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. पुढील टप्प्यात पूर्ण नग्न आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिल्याने शेतकरी प्रश्नावरून आंदोलनाला आता अधिक आक्रमक वळण मिळण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीवर सरकार आणि प्रशासन काय भूमिका घेतात, कोरड्या दुष्काळाबाबत कोणता निर्णय घेतला जातो आणि तुपकरांच्या इशाऱ्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा काय असणार, याकडे आता अमरावतीसह संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button