वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट

महिनाभरापेक्षा अधिक काळ पावसाची दडी; सोयाबीन, तूर आणि कापूस पिके वाळली, पंचनामे आणि नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी
वाशिम : वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामावर मोठे संकट ओढावले आहे. महिनाभरापेक्षा अधिक काळ पावसाने दडी मारल्याने कोरडवाहू शेतातील सोयाबीन, तूर आणि कापूस पिके अक्षरशः वाळून गेली आहेत. त्यामुळे जिल्हा आता कोरड्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यंदा जून महिन्यात पावसाने उशिरा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठ्या कसरतीने खरीप पिकांची पेरणी पूर्ण करावी लागली. त्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, ऑगस्ट महिना जवळपास पूर्णपणे कोरडा गेल्याने पिकांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत गेली.
पावसाचा दीर्घ खंड बसल्याने कोरडवाहू शेतातील सोयाबीन आणि तूर पिके वाळून गेली असून, कपाशीवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. पिकांना आवश्यक त्या कालावधीत पाऊस न मिळाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील काही सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी उपलब्ध पाण्याच्या मदतीने पिके वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र, वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती कोरडवाहू असल्याने हजारो शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे.
विशेष म्हणजे आता पाऊस झाला तरी अनेक ठिकाणी वाळून गेलेल्या पिकांना त्याचा फारसा फायदा होणार नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.
पावसाअभावी यंदाचा खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने परिस्थितीची तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आता प्रशासन किती तत्परतेने पिकांच्या नुकसानीची दखल घेत पंचनामे करते आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देते, याकडे संपूर्ण वाशिम जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



