धामणगाव रेल्वेत गोगाजी महाराजांच्या उत्सवाचा भक्तिमय जल्लोष

महाकाली मंदिरापासून रामदेव बाबा मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक; ढोल-ताशांचा गजर, धार्मिक झाकी आणि जयघोषाने शहर दुमदुमले
धामणगाव रेल्वे | अमरावती
धामणगाव रेल्वे शहरात भगवान गोगाजी महाराजांच्या उत्सवानिमित्त भक्ती आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. महंमदपुरा येथील महाकाली मंदिरापासून रामदेव बाबा मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. ढोल-ताशांचा गजर, भगवान गोगाजी महाराजांचा जयघोष आणि आकर्षक धार्मिक झाकींनी मिरवणुकीची शोभा आणखी वाढवली.
महंमदपुरा येथील महाकाली मंदिरापासून भगवान गोगाजी महाराजांच्या उत्सवानिमित्त भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक रामदेव बाबा मंदिरापर्यंत काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला, पुरुष, युवक-युवती, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
पारंपरिक वेशभूषेतील भाविक, ढोल-ताशांचा गजर आणि डीजेच्या तालावर थिरकणारे युवक-युवती यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. भगवान गोगाजी महाराजांच्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले.
मिरवणुकीदरम्यान सादर करण्यात आलेल्या विविध धार्मिक झाकींनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये जगन्नाथ भगवंताची आकर्षक झाकी विशेष आकर्षण ठरली. झाकी पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी उत्साहात मिरवणुकीचे स्वागत केले.
या मिरवणुकीत विविध समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. त्यामुळे सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सलोख्याचे दर्शन घडले. धार्मिक श्रद्धेसोबतच समाजातील एकतेचा संदेशही या मिरवणुकीतून देण्यात आला.
अखेर भव्य मिरवणूक रामदेव बाबा मंदिर परिसरात पोहोचली, येथे भक्तिमय वातावरणात उत्सवाची सांगता करण्यात आली.
भगवान गोगाजी महाराजांच्या भक्तीने भारावलेल्या या भव्य मिरवणुकीमुळे धामणगाव रेल्वे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी ही मिरवणूक नागरिकांसाठी अविस्मरणीय ठरली.
सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे.



