citynewsDhamangaonLatest NewsMaharashtra

धामणगाव रेल्वेत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा भक्तिमय जल्लोष

हजारो भाविकांच्या उपस्थितीत जन्माष्टमी महोत्सव उत्साहात; हरीनाम संकीर्तन, कृष्णलीला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर झाला कृष्णमय

धामणगाव रेल्वे | अमरावती

धामणगाव रेल्वे शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा भक्तिमय उत्साह पाहायला मिळाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावाने संपन्न झाला. हरीनाम संकीर्तन, कृष्णकथा, कृष्णलीला, नृत्य-नाट्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर हरे कृष्ण हरे रामच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

प.पू. लोकनाथस्वामी महाराज तसेच श्रीकृष्णकृपामूर्ती ए.सी. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या प्रेरणेने इस्कॉन अमरावती आणि समस्त हरे कृष्ण भक्तगण, धामणगाव रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने लुनावत नगर येथील आरोही रिसॉर्टमध्ये भव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवाला महिला, पुरुष, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच बालभक्तांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हरे कृष्ण हरे रामच्या जयघोषाने संपूर्ण आरोही रिसॉर्ट परिसर भक्तिमय झाला होता.

महोत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भजन संध्या आणि हरीनाम संकीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. यासोबतच श्रीकृष्णकथा, कृष्णलीलेवर आधारित नृत्य आणि नाट्य सादरीकरण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा क्षण जवळ येताच भाविकांमध्ये उत्साह आणखी वाढला. जन्मोत्सवाच्या वेळी झालेल्या संकीर्तन आणि भक्तिमय नृत्यामुळे वातावरण अधिकच कृष्णमय झाले. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने श्रीकृष्णाचे दर्शन घेतले आणि भक्तीभावाने जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला.

महोत्सवाच्या सांगतेप्रसंगी हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत जन्माष्टमी महोत्सवाची सांगता केली.

या भव्य आयोजनामुळे धामणगाव रेल्वे शहरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी समस्त हरे कृष्ण भक्तगण आणि आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम घडवून आणणारा हा जन्माष्टमी महोत्सव भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.

सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button