BuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

गणेशोत्सवातील DJ बंदीवरून बुलढाण्यात भाजपमध्येच मतभेद

नगराध्यक्षांची DJ बंदीची मागणी; आमदार श्वेता महाले संतापल्या, म्हणाल्या बंदी असेल तर सरसकट करा

बुलढाणा : गणेशोत्सव जवळ येताच राज्यभर DJच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असताना आता बुलढाण्यातही DJ बंदीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत भाजपच्या नगराध्यक्षांनीच गणेशोत्सवात DJवर बंदी घालण्याची आक्रमक मागणी केली. मात्र याच मागणीवर भाजप आमदार श्वेता महाले यांनी नाराजी व्यक्त करत सरसकट बंदीची भूमिका मांडली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात जिल्हा शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजप आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

गणेशोत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावा, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण राहावे, यासाठी गणेशोत्सवातील DJच्या वापरावर बंदी घालावी, अशी मागणी भाजपच्या नगराध्यक्षांकडून करण्यात आली.

मात्र, याच मुद्द्यावर आमदार श्वेता महाले यांनी स्पष्ट भूमिका मांडत नाराजी व्यक्त केली. लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम आणि इतर विविध सोहळ्यांमध्ये DJचा वापर होत असताना केवळ गणेशोत्सवातच DJवर बंदी का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

DJमुळे ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न असेल आणि त्यावर प्रशासनाला कारवाई करायची असेल, तर नियम सर्वांसाठी समान असायला हवेत, अशी भूमिका आमदार श्वेता महाले यांनी मांडली. DJवर बंदी घालायची असेल तर ती केवळ गणेशोत्सवापुरती मर्यादित न ठेवता सरसकट असावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी प्रशासनासमोर केली.

त्यामुळे जिल्हा शांतता समितीच्या बैठकीतच DJ बंदीच्या मुद्द्यावरून वेगवेगळ्या भूमिका समोर आल्याने बुलढाण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

एकीकडे ध्वनिप्रदूषण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गणेशोत्सवातील DJवर बंदीची मागणी, तर दुसरीकडे सर्वच कार्यक्रमांसाठी समान नियम लागू करण्याची आमदार श्वेता महाले यांची भूमिका, यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात DJचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.

आता प्रशासन गणेशोत्सवातील DJच्या वापराबाबत नेमकी काय भूमिका घेते आणि नियम सर्व कार्यक्रमांना समान पद्धतीने लागू केले जातात का, याकडे जिल्ह्यातील गणेश मंडळांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी गजानन राऊत, बुलढाणा.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button